Category Archives: Book

‘Alaukika’ अलौकिका

अलौकिका

“ती”, जीवशास्त्रीयदृष्ट्या मानववंशातील स्त्रीरूप. वेगवेगळ्या काळात, जगाच्या पाठीवरील निरनिराळ्या भागातील ‘तिच्या’ विविध अलौकिक रूपांना जाणण्याचा हा प्रयत्न आहे. सन्मीत्रचे मागोवा हे साप्ताहिक सदर, लोकसत्ताच्या चतुरंग मधील प्रकाशित झालेले आणि काही अप्रकाशित राहिलेले लेख एकत्र करून या पुस्तकाची रचना झाली आहे.

माझ्या पीएच.डी. च्या संशोधनादरम्यान शिलालेखातील समर्थ स्त्री जीवन उलगडत होते. त्याच बरोबर विविध साहित्यातून प्रकट होणाऱ्या भारतीय व अभारतीय स्त्रियांचे वेगळपण जाणवत  होते. या पुस्तकातील स्त्रियांचा काळ, कार्यक्षेत्र आणि कर्तृत्त्व भिन्न असले तरी त्यांच्यातील उत्कटता आणि उर्जा हा एक समान दुवा होता. या एका सूत्राने ही ३४ लेखांची माला गुंफलेली आहे.

स्त्रीरुपाची पहिली अभिव्यक्ती पाषाणयुगातील छोट्या मातीच्या मुर्तीन्मधून स्पष्ट होते. त्यांच्या  निर्मितीमागील का, कधी, कोणी, कशाकरिता असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. मानवी समाजातील स्त्रीच्या बदलत्या स्थितीचा मागोवा घेत या पुस्तकाचा प्रवास सुरु होतो.

सिंधू- सरस्वती संस्कृतीतील ‘अबोल’ पुराव्यांमुळे येथील स्त्रीजीवनाचे अनेक पैलू अवगुंठीत राहतात. यानंतरच्या वाटचालीत कधी वाङमयीन तर कधी पुरातत्वीय साधनांचा आधार घेत स्त्रियांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

‘अपाला, मुद्गलानी, घोषा, सरमा’ यांनी  सुक्तरचना करून ऋग्वेदात आपले अढळ स्थान निर्माण केले. भारतीय इतिहासाला माहित असलेल्या त्या पहिल्या स्त्रिया आहेत. त्यातील ‘उर्वशीचे’ कथाबीज इतके मोहक होते की ही कथा महाभारत आणि कवी कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या  नाटकात देखील पुन्हा आली आहे.

प्राचीन भारतीय दाखल्यांमधून स्त्रीशिक्षणाची परंपरा स्पष्ट होत जाते. भारतीय समाजाची वाटचाल वैशिष्ट्यपूर्णरित्या झालेली आहे. ज्या समाजात विद्याविभूषित स्त्रियांचा ‘ब्रह्मवादिनी’ हा खास वर्ग होता, त्याच समाजात स्त्रीशिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून संघर्ष छेडूनही २००१ च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरता केवळ ५४.१६% एवढीच मर्यादित आहे.

व्यासांनी महाभारतात रचना केलेल्या ‘द्रौपदी, गांधारी’ या व्यक्तिरेखांनी शेकडो वर्षे मनमानसावर मोहिनी केली आहे. महाभारतातीलच ‘उर्वशी, माधवी, सत्यवती, दमयंती आणि देवयानी’ यांच्या कथांमध्येदेखील विलक्षण नाटय आहे.

वरील सर्व स्त्रियांचा उल्लेख वेद, उपनिषदे आणि महाकाव्यात झालेला आहे. इतिहास विविध पुराव्यांच्या आधारावर तोलला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकानंतरच्या काळात मुबलक वाङमयीन आणि पुरातत्वीय साधने उपलब्ध होत गेली. या काळानंतरच्या स्त्रिया ‘साहित्यातील कलाकृती’ न राहता वास्तव होत जातात.

‘थेरीगाथेतील’ बौध्द भिक्षुणी मोक्षाच्या ओढीने समाजाच्या विविध स्तरांतून गौतम बुद्धाच्या  पायाशी झेपावल्या होत्या.   ऋग्वेदातील अपाला, इशिदासी ,भदा कुंडलकेशी, सुमेधा या सारख्या बौद्ध थेरी किवा मध्ययुगातील संत स्त्रिया यांचा विश्वास, निष्ठा आणि समर्पण एकाच प्रकारचे होते, आराध्य दैवत, गुरु आणि पंथ भलेही निरनिराळे होते.

सौंदर्य आणि समर्पण यांच्या चौकटीतून बाहेर पडून स्त्रीचे एक निराळेच रूप आपल्याला ‘कातीलाना हुस्न’ मध्ये दिसते. कधी देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ती उचलते तर कधी एखाद्या कटाचा हिस्सा बनून ‘विषकन्या’ झालेली दिसते. या विषकन्यांचे भयप्रद सावट भारताच्या सीमारेषा ओलांडून थेट अलेक्झांडरशी निगडीत असलेल्या दन्तकथांमध्ये सामील झाले होते.

‘मौर्याकाळातील वेश्याव्यसायाचे’ महाजाल कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून उलगडते. गणीकेची निवड, तिचा दर्जा, तिचा तनखा, तिने पाळायचे नियम, निवृत्तीनंतरची सोय या सर्वांचेच सखोल वर्णन अर्थशास्त्रात आहे.

शरीरविक्रय हे ‘नित्यसुमंगली’ अर्थात देवदासी यांचे देखील प्राक्तन असले तरी त्यांच्या सामाजिक दर्जात गणीकांपेक्षा मोठा फरक होता. नित्यसुमंगली ही देवाची विधीवत पत्नी असते. इंग्रजीत तिला ‘ritual specialist’ असेही म्हणतात. राजाश्रयाने दृढ होत गेलेली ही प्रथा कायद्याने बंद केली असली तरी समाज मान्यतेच्या जोरावर आजदेखील देवदासी प्रथा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे.

महाराष्ट्राच्या गौरवगाथेच्या  पहिल्या पानावर एका स्त्रीचा, सातवाहन राणी ‘नागनिकेचा’ उल्लेख आहे आणि मराठी माणसाला तिच्याबद्दल फारसे माहीतीही नाही. तीच कथा मराठी मातीतील आद्य वीरमाता ‘गौतमी बालाश्री’ हिची. ‘प्रभावती गुप्त’ ही देखील इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर येत नाही.

मध्ययुगात जेंव्हा विपरीत राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, रुढी आणि परंपरांनी भारतीय स्त्रीविश्वाला ग्रासले होते तेंव्हाही त्यांची मोक्षाची ओढ प्रबळ ठरत होती. आखून दिलेल्या सगळ्या चौकटी तोडून समर्पणाची भावना लिंगपर असते, हेच यातून स्पष्ट होते.

कुणी ईश्वरावर सर्वस्व समर्पित केले तर कुणी आपल्या जीवलगासाठी. हीच भावना ‘मस्तानी’ मध्ये  होती.  राऊची भक्ती हेच तिचे आयुष्य असावे. अशीच वेडी निष्ठा ‘येसूबाई सावरकर आणि रुक्मिणीबाई बापटांच्या’ भावविश्वाला व्यापून राहिलेली दिसते.

भारताबाहेरील प्राचीन ते अर्वाचीन काळातील स्त्री विश्वाचा मागोवा घेताना सत्य आणि काल्पनिकतेच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या ‘अॅमेझॉन’ स्त्रीविश्वाची ओळख होते. ‘The face that launched a thousand ships’ असे जिच्याबद्दल म्हटले जाते ती हेलन. होमरच्या इलियड या महाकाव्याची नायिका. याच हेलनच्या मोहापायी ग्रीक राष्ट्राचा संहार घडून आला.

प्राचीन इथिओपिया, इस्राइल यांना जोडणारा दुवा होती, राणी ‘मकिडा’. ज्यू ,ख्रिस्ती आणि अरब धार्मिक साहित्यातून मकिडा आणि इस्राइलचा ज्यू राजा सॉलोमन, या त्या काळातील अत्यंत हुशार व्यक्तींमधील स्नेहाचे बंध उलगडत जातात.

महाराष्ट्रातील तीन राण्यांचा उल्लेख यापूर्वी आला आहेच. जगातील पहिली राणी मात्र इजिप्तमध्ये होती. इसवी सन पंधराशे पूर्वी इजिप्तवर राज्य करून ‘राणी हॅत्शेप्सुतने’ जगाच्या इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, मग ज्या अंगी देवपण त्याचे काय? नेपाळमध्ये बालपणीच देवपण लादलेल्या छोट्या ‘कुमारी मातांना’ वयात आल्यावर मात्र  देवपणातून मुक्त केले जाते. कुमारी माता  ही नेपाल नरेशांचे आराध्य दैवत आहे.

अमेरिकन स्त्रियांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी अगदी स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून झगडावे लागले होते. हळूहळू स्त्रियांमध्ये राजकीय जागृती होऊ लागली. ‘मतदानाच्या हक्कासाठी’ अमेरिकन स्त्रियांना द्याव्या लागलेला संघर्ष १९२० च्या घटनादुरुस्तीने यशस्वीरीत्या संपला.

लहानपणी गोष्टीतले राक्षस जंगलांचा नाश करायचे. हल्ली ही भूमिका माणूसच करतोय. उजाड पर्यावरणाला हिरवाईची पाखर घालणारी ‘वांगारी मथाई’ ही केनियाची खरी खुरी वनराणी. ग्रीन बेल्ट या तिच्या संघटनेच्या कामामुळे आज केनिया आणि  आसपासच्या देशांत लाखो वृक्षांची लागवड झाली आहे. हे काम स्थानिक स्त्रियांच्या सहभागाने केले जाते. २००४ साली नोबेल शांती पुरस्कार मिळवलेली ती एकमेव आफ्रिकन स्त्री आहे.

‘अलौकिका’ चे लेखन जवळजवळ पूर्ण होत आले होते आणि बातमी झळकली, म्यानमारच्या आंग सान सु ची हिची सुटका झाली. तिच्या शिवाय अलौकिकांचे स्तुतीसुक्त पूर्ण होते शक्यच नव्हते.

स्त्रियांच्या इतिहासाचा कालपट खुपच मोठा आहे. त्यातील सर्वच वळणांवर थांबणे पुस्तक मर्यादेमुळे शक्य झालेले नाही. ऐतिहासिक संदर्भांचा पाठपुरावा करीत आणि आजवरच्या अनोळखी किंवा अल्पपरीचीत स्त्रिया आणि प्रथा यांना समजून घेत ही वाटचाल झालेली  आहे.

परम मित्र प्रकाशानाचे श्री. माधव जोशी यांनी या लेखमालेच्या पुस्तकमूल्यावर विश्वास ठेवल्यामुळे तसेच विवेक बुवा आणि प्रा. उदय रोटे यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच ‘अलौकिका’ पुस्तक रुपाने आपल्या समोर येत आहे.

रुपाली मोकाशी

22/12/2010

dr.rupalimokashi@gmail.com

Advertisements