Caudharapāḍā Rock Edit of Śilāhāra King Keśideva – II (śaka era1161)


शिलाहार राजा दुसरा केशिदेव याचा चौधरपाडा (बापगाव) शिलालेख

शक संवत ११६१ (इ.स. १२३९)

  1. सिद्धम I ॐ नमो विनायकाय II नमामि भुवनोत्पत्तिस्थितीसंहारकारीणं(णम्) I श्रीमत्षुंपेश्व
  2. रं भक्तजनसर्वार्त्तिहारीणं II१ II श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्ज्जीमूतकेतो: कु
  3. ले विख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय (य:) श्रीकेशिपृथ्वीपति: I यस्यापारपवित्र
  4. पौरुषनिधेरालोक्य राज्यस्थितिं श्रीरामादिमहिभुजां भगवती धत्ते
  5. धरा न स्मृतिं II२II स(श)क संवत् ११६१ विकारीसंवत्सरांतर्गत माघ वदि १४
  6. चतुर्द्द्श्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणी अद्येह समस्तराजावलीसमलंकृ
  7. महाराजाधिराजकोकणचक्रवर्त्तिश्रीकेशिदेवकल्याणवि
  8. जयराज्ये तथैतत्प्रसात्समस्तराज्यमंडलचिंताभारं समुद्वहति I
  9. महामात्ये श्रीझंपडप्रभु महासांधिविग्र(हि)क राजदेवे पंडित श्री
  10. करणभांडागारे अनंतप्रभु प्रमुखे(षु) सत्सु एतस्मिन्काले प्रवर्तमाने
  11. सति ब्रह्मपुरीग्रामदानसा(शा)सनं समधिलिक्ष(ख्य)ते यथा II श्रीषोंपेश्व
  12. रदेव पूजनसदाव्यासक्तसर्वा(न्तरः) I सत्पात्रद्विज सोमनायक
  13. व (ब)टोः संतानयो(भो)ग्यस्थितिं (तिम्) I श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहा
  14. रिणीं I वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: II३II बटुक
  15. नामानि कथ्यंन्ते I सोमनाययक: सुर्य्यनायक: I गोविंदनायक: I नाऊ
  16. नायक: I इति चत्वारो बटुका: II निर्व्वाहाय पुरारिपूजकबटुश्रेणी द्वि
  17. जानां सदा वो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे/ज)सपल्लीपुरा दत्ता श्रीशि
  18. वरात्रि पर्व्वणी विभो षोंपेश्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चं
  19. द्रार्क्कतारावधि II४II (राज्य)स्य मंत्रीणान्यैर्व्वा कर्तव्यं धर्म्मपालनं I धर्म
  20. ध्वंशे ——– नरकस्थितिं II५II तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनि
  21. भि: I सुवर्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं I हरन्नरकमाप्नोति या
  22. (वदाभूत) संप्लवं II६II मंगलं महाश्री I (शुभं भ) वतु II ले(ख)कपाठयोः II

     

इस ८०० ते १२६५ अशा साडे चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत शिलाहार राजघराण्याने उत्तर कोकण प्रांतावर राज्य केले. श्रीस्थानक अर्थात ठाणे ही त्यांची राजधानी होती. या राजघराण्याचा इतिहास समजण्याकरिता आज फार थोडी लिखित आणि पुरातत्वीय साधने उपलबद्ध आहेत. त्यापैकी या राजांनी दिलेली ताम्रपट आणि शिलालेख स्वरूपातील दानपत्रे अतिशय मूल्यवान आहेत.

आपल्या ऐतिहासिक कल्याण शहराच्या आसपास शिलाहारांचा इतिहास उलगडून सांगणारी अनेक दानपत्रे, मंदिरे आणि नाणी उपलबद्ध होत आहेत. भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.

शिलाहार राजे शिवभक्त होते. त्यांनी अप्रतिम भूमिज शैलीतील अनेक शिव मंदिरे बांधली. राजा झंझ याने बारा शिव मंदिरे बांधल्याचा उल्लेख काही  उत्तरकालीन शिलाहार ताम्रपटामध्ये आहे . या बाबत अधिक माहिती साठी

https://rupalimokashi.wordpress.com/2018/12/09/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9D-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AE/

कल्याण परिसरातच खिडकाळी, लोनाड मधील भग्नावस्थेतील रामेश्वर आणि बापगाव परिसरातील सुम्पेश्वर या तीन मंदिरांबद्दल दुर्दैवाने अधिक माहिती आजतरी उपलब्ध नाही.

बापगाव येथील माळरानात दुर्लक्षित अवस्थेत पडलेला राजा दुसरा केशिदेव याने कोरविलेला शिलालेख आता नष्ट झालेल्या सुम्पेश्वर मंदिराबद्दल काही माहिती देतो. इस १८८२ मध्ये  ही शीला सापडल्याची नोंद आहे. त्यावरील लेखाचे वाचन पं. भगवानलाल इंद्राजी यांनी केले होते. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. या लेखात २२ ओळी आहेत.

शिळेच्या वर सूर्य, चंद्र आणि मंगल कलश आहेत तर खालच्या भागात गद्धेगाळ (गर्दभशाप) आकृती स्वरुपात कोरलेली आहे. ही विशिष्ट परंपरा शिलाहारांच्या शिलालेखात राजा अरिकेसरी (केसिदेव याचा अलिबाग जवळील अक्षी येथील शिलालेख) याच्या काळापासून दिसून येते. याचे एक अनुमान असे आहे की यातील स्त्रीरूप म्हणजे पृथ्वी आणि गाढव हे साथीच्या भयंकर रोगांची कर्ती शितळादेवीचे वाहन होते. राजाने दिलेले दान कुणीही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला दिलेला हा साथीचे रोग, भयंकर दुष्काळ अथवा अन्नान्न दशेचा शाप होता. ताम्रपटात हा शाप श्लोकस्वरूपात असतो.

Chaudharpada Rock Edict of Shilahara King Keshideva IIशिलाहारंचा पंचविसावा राजा दुसरा केशिदेव याने इस १२३९ (मंगळवार, शक संवत ११६१, विकारी संवत्सर माघ वद्य चतुर्दशी, शिवरात्र ) रोजी प्रस्तुत लेखात त्याने दिलेल्या दोन दानांची नोंद केली आहे. यावेळेस बापगाव (ब्रह्मपुरी) परिसरात ‘पृथ्वीतलावर अत्यंत मनोहारी असे शिवमंदिर’ असल्याची नोंद तेराव्या ओळीत स्वत: केशिदेवाने केली आहे. (श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं)

हेच सुम्पेश्वराचे मंदिर होय. हे मंदिर कधी आणि कसे उध्वस्त झाले हे समजण्यास मार्ग नाही. मात्र सुदैवाने मंदिरातील भव्य पिंडी आणि उमा माहेश्वराची सुंदर मूर्ती या सर्वाची साक्षीदार म्हणून बचावली आहे.

वर नमूद केलेल्या दिवशी ब्रह्मपुरी हे गाव सोमनाययक, सुर्य्यनायक, गोविंदनायक, नाऊनायक या चार ब्राह्मणांस दान दिले. बाराव्या ओळीत नमूद केल्याप्रमाणे हे दान सोमनायक याच्या वंशजांनी उपभोगायचे होते. याचाच अर्थ, सुर्य्यनायक, गोविंदनायक आणि नाऊनायक ही त्याची मुले असावीत. इतर शिलाहार लेखांप्रमाणे ह्या दान स्वीकारणाऱ्या ब्राह्मणांचे निवासस्थान, गोत्र , वडिलांचे नाव इत्यादी माहिती दिलेली नाही. अर्थात शिलालेखात थोडक्या जागेत महत्वाचा मजकूर कोरवायचा असतो या मर्यादेमुळे हे झाले असावे. इथे मुद्दाम सांगावयास हवे की शिलाहार राजांकडून दान मिळवणारे बहुतांश विद्याविभूषित ब्राह्मण कऱ्हाड येथील होते.

१६ आणि १७ व्या ओळीत सुम्पेश्वराच्या मंदिरात असणाऱ्या ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहासाठी बोपग्राम (बापगाव) येथील मजासपल्ली ही वाडी देखील दान दिली.  या प्रसंगी केशिदेवाचे मंत्रिमंडळ उपस्थित होते. प्रस्तुत लेखामध्ये महामात्य श्रीझंपडप्रभु, महासांधिविग्र(हि)क राजदेव पंडित आणि श्रीकरणभांडागार अनंतप्रभु यांची विशेष उपस्थिती नोंदविली आहे. (ओळ ९-१०).

आज शिलाहार राजधानी ठाण्यात पोर्तुगीजानी केलेल्या विध्वंसामुळे विशेष काहीही उपलब्ध नाही. त्यामुळे या ७७४ वर्षे प्राचीन अश्या शिलालेखाचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

 


Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.