Kalyan Dombivli municipal corporation election 2010- मतदारांना आवाहन

मतदानासाठी आवाहन : मत हे दुधारी तलवार! – प्रा.(डॉ.) रूपाली मोकाशी कल्याण

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कारभारात प्रचंड अनागोंदी कारभार होणार आहे. तेथील जनतेला आपण आताच सावध करून ठेवावे, याची प्रचीती अनेक वर्षांपूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आली होती की काय असे मला वाटते. कारण संत तुकडोजी महाराजांनी जे निवडणूकविषयक कवन रचले आहे, ते तंतोतत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कारभार आणि निवडणूक पद्धतीला लागू पडत आहे.तुकडोजी महाराज म्हणतात,

निवडणूक नव्हे बाजार चुणूक! निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची!

निवडणूक जणू स्वयंवर! ज्या हाती द्यावे जीवनाचे बागडोर!

यासी लावावी कसोटी सुंदर सावधपणे! नाती गोती पक्ष पंथ!

जाती गरीब श्रीमंत! देवघेव भीडमुर्वत!

यासाठी मत देऊची नये! भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे!

आपुल्या मतावरील साचे!

एकेक मत लाखमोलाचे!ओळखावे याचे महिमान!

मत हे दुधारी तलवार!उपयोग न केला बरोबर!

तरी आपुलाची उलटता वार!आपणावर शेवटी!

दुर्जन होतील शिरजोर!आपुल्या मताचा मिळता आधार!

सर्व गावास करतील जर्जर!न देता सत्पात्री मतदान!!

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तात्काळ भारतातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. आज जगातले कितीतरी देश मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी झगडत आहेत. मग भाग्यवान कोण? हे भाग्य आपल्याला साठ वर्षांपूर्वी मिळाले असेल तर त्या लाखमोलाच्या मताचा योग्य पुरेपूर वापर करायला नको का? आपण आपल्या मताविषयी किती जागरूक आहोत. राजकारणात, प्रशासनात अनागोंदी, भ्रष्टाचार आहे. तो आपण एकटय़ा दुकटय़ाने नष्ट करू शकत नाही. कारण तो एका व्यवस्थेतला गैरप्रकार आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी आपण मतदानाच्या पद्धतीचा प्रभावीपणे अवलंब केला पाहिजे. राजकारणातील घाण पाहून सामान्य, मध्यमवर्गीय तो शिंतोडा आपल्या अंगावर नको म्हणून राजकारणापासून दूर राहतो, पण त्याचाच गैरफायदा ही राजकीय मंडळी घेत आहेत याचा आपण कधी विचार करीत नाही. त्यामुळे दुर्बल घटकाला व्यवस्थित मॅनेज करून ही मंडळी निवडून येतात. ही मंडळी कोण, कुठली याचा विचार दुर्बल घटकातील वर्ग मतदान करताना करीत नाही. त्यामुळे गावगुंड, भू-माफिया, चोरचिल्टे यांच्या हातात आपल्या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या जातात. यांच्या बेगुमान कारभाराकडे बघण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. म्हणून सामान्य, मध्यमवर्गाने आपल्याला राजकारणाविषयीचा न्यूनगंड काढून दगडापेक्षा वीट बरी. पाचपैकी एक उमेदवार शिकलेला, चांगला असेल तर तो विचार करून किमान मतदान करावे. शेवटी आपल्या प्रभागाचे, शहराचे भवितव्य त्या नगरसेवकाच्या हातात आपण देत असतो. आतापर्यंत कोणीपण उठतो नि नगरसेवक होतो. त्यामुळे राजकारणापेक्षा नगरसेवकपद धंद्याकडे वळत आहे. हा आपल्यावरील आणि शहरावरील मोठा धोका आहे. आता पक्षीय परंपरा, नातीगोती जरा बाजूला ठेवा. कारण ते दिवस गेले. आता आपल्याला शहरात सन्मानाने राहायचे असेल तर आपली विश्वस्त संस्था पालिका हिच्याविषयी दोन शब्द कोणी चांगले बोलले पाहिजेत. तिचा कारभार चांगला चालला पाहिजे. असे होताना आता दिसत नाही. कारण तुम्ही आम्ही मतदानाला बाहेरच पडत नाहीत. मतदान करताना त्या उमेदवाराच्या उपजीविकेचे साधन काय, केवळ तो पैसा कमविण्यासाठी येतोय का याचा अंदाज घ्या. शहराविषयी तळमळ, नवीन करण्याची उमेद असलेला, शिक्षित, प्रामाणिक उमेदवार कोण आहे याचा विचार करा. तो पालिकेत पाठवा. अशी चांगली माणसे जेव्हा पालिकेत जातील तेव्हाच गाव सुंदर होईल. टिळकनगरची एक अपक्ष नगरसेविका आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर करू शकते, मग बाकीच्या नगरसेवकांना काय निधी म्हणून चिंचोके मिळतात का?त्यांचा पैसा कोठे जातो? तो कोठे गेला हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही. मतदार हा मालक आहे. आयुक्त आणि नगरसेवक हे जनसेवक आहेत. त्यामुळे पालिकेतील प्रत्येक पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. नोकरीत बढती, वेतनश्रेणी वाढ होण्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याने मी किती काम करतो, माझी गुणवत्ता काय असे अ‍ॅप्रायझल प्रथम भरून द्यावे लागते. मग १५ वर्षे नगरसेवक असलेले पुन्हा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांची गुणवत्ता काय, त्यांनी अशी कोणती विकासाची कामे केलीत की त्यांना २० वर्षे नगरसेवक होण्याचा अधिकार? पक्षाने या बढत्या देण्यापूर्वी आपल्या नगरसेवकाने किती कामे केली, आता त्याला किती वेळ त्या खुर्चीवर बसून ठेवायचे, नवीन कार्यकर्त्यांला बढती नको का याचा विचार करायला पाहिजे. केवळ आश्वासननाम्यांचा पाऊस पाडायचा आणि ते वाचताही न येणारे नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून जाणार असतील तर आनंदीआनंद असणारच. हे सर्व चित्र पालटण्यासाठी किमान शिक्षण असलेला, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असलेला प्रामाणिक उमेदवार निवडा. तुकडोजी महाराजांच्या कवनाचा अर्थ विचारात घेऊन शहराचा कायापालट करण्यासाठी मोठय़ा संख्येने मतदान करा.
साभार
लोकसत्ता ( ठाणे वृत्तांत – २९/१०/२०१०)

Advertisements

One thought on “Kalyan Dombivli municipal corporation election 2010- मतदारांना आवाहन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s