खमंग कायस्थी culinary traditions of C.K.P. community/ CKP FOOD (लोकसत्ता – चतुरंग – २७-फेब्रुवारी-२०१०)

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रत्येक प्रांताची व तिथल्या वेगवेगळ्या ज्ञातींची खास खाद्यवैशिष्टय़े आहेत. त्याचा रसदार मागोवा घेणारे हे पाक्षिक सदर. यावेळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सी.के.पी लोकांमध्ये केल्या जाणाऱ्या पदार्थाविषयीची माहिती देणारा लेख..

भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा व चालीरीतींबरोबरच वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीही रूजली. या परंपरा जोपासण्याचे तसेच हा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम घराघरांतील अन्नपूर्णा करीत आल्या आहेत. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सी. के. पी.ही आपली खास खाद्य परंपरा व रूढी जपणारी ज्ञाती. त्यांच्या खमंग खाद्यसंस्कृतीची ही एक झलक.
सी. के. पी. घरांतून वर्षभर या ना त्या निमित्ताने खाद्यउत्सव साजरा होत असतो. या चोखंदळपणाची सुरुवात ‘दररोज खायची ती चपाती’ व ‘सणासुदीला करायची ती पोळी’ येथून होते.
‘अधिक’ महिन्यात जावयाचे कोडकौतुक केल्यावर कायस्थ गृहिणीला वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा केल्यावर संध्याकाळी बाळगोपाळांना मात्र वेध लागतात तुपात खरपूस तळलेल्या ‘आरत्यांचे’. ताम्हणातील काडवातींच्या दिव्याला नमस्कार करून कणीक व गूळ घालून केलेल्या त्या कुरकुरीत आरत्या फस्त करण्याची स्पर्धाच सुरू होते. शिळासप्तमीचे वाणदेखील मुलांसाठीच. ‘सांदणी’ हा तांदळाच्या रव्याचा इडलीसारखा वाफवलेला गोड पदार्थ. वाफवलेल्या कातीव ‘सांदण्या’ केशरकाडय़ांच्या नाजूक नक्षीकामासह खूप छान दिसतात. नागपंचमीला मुरडीच्या नारळाच्या चवाने तट्ट भरलेल्या ‘शेंगा’ जाणकार कायस्थ हातांनीच बनवाव्यात. श्रावणाला निरोप देताना कायस्थ घरात ‘निनावे’ हा पदार्थ बनतो. ज्याने कुणी हा अतिशय खमंग पदार्थ पहिल्यांदा बनविला, त्याने या पदार्थाला ‘बिननावाचा’ का केला कुणास ठाऊक? अर्थात प्रत्येक पदार्थाला त्याचे विशिष्ट नाव कसे व कधी मिळाले, हा संशोधनाचा विषय आहे. डाळीच्या पिठाचा हा अत्यंत खमंग पदार्थ जिभेवर पडताच विरघळून जातो.
कायस्थ माणूस आयुष्यातील सर्व सुखांचा भलेही त्याग करेल, पण कडवे वाल, कडव्या वालांची डाळ, (ही प्रजाती नामशेष झालेली आहे!), पेणचे पोह्य़ाचे पापड (डांगरासकट मिळाल्यास बहारच) आणि पोहे यासाठी जीव टाकेल. आठवडय़ातील सोमवार, गुरुवार किंवा शनिवार ज्यांच्या घरी वालाच्या, मुगाच्या बिरडय़ाचा वास दरवळत नाही, त्यांना चित्रगुप्त कायस्थांच्या यादीत घालणे शक्यच नाही. इवल्या इवल्या मोड आलेल्या मुगांची हिरवी झालर कौशल्याने उतरवून त्यांना बिरडय़ात टाकले जाते. वालाची मिजास काही औरच! त्यांची खमंग खिचडी बनते किंवा साप्ताहिक बिरडय़ाचा कार्यक्रम ठरलेला असतोच. वाफाळलेल्या भाताबरोबर जोडीला तळलेला पोहा पापड हवाच. बिरडे परतायचे नसते, तर ‘सवताळायचे’ असते; हे गुपित कायस्थ स्त्रीने परंपरागतच प्राप्त केलेले असते.
नवरात्रीची चाहूल लागताच देवीला सोनपावलांनी आवतण देण्याची धांदल उडते. सवाष्णींचे वार ठरले जातात. घरोघरी जाऊन हळदीकुंकू लावून सवाष्णींना त्या वारांची आठवण करून दिली जाते. उपास करायला विसरू नका, असा प्रेमळ आग्रह केला जातो. या सवाष्णींचे दोन प्रकार- कोरडय़ा व सुक्या. या पूजेची तयारी मोठी लांबलचक. दोन-तीन दिवस आधीच सामुग्रीची जमवाजमव सुरू होते. सुका मेवा, अबीर, गुलाल, फळे, काकडय़ा, गजरे, अत्तर अशा एक ना अनेक चिजा असतात. या पूजेचे वैशिष्टय़ म्हणजे सवाष्णींना देवरूप मानून त्यांचीच यथासांग पूजा घरच्या सवाष्णी करतात. अगदी दूधपाण्याने पाय धुण्यापासून ते ओटी भरण्यापर्यंत. हातावर ताज्या उगाळलेल्या चंदनाचा लेप लावून त्यांना जणू दृष्ट लागू नये म्हणून अबिराची टिकली लावली जाते. हे लेणं स्त्रिया हातातील गोठ पाटल्यांपेक्षा जास्त जपून घरी नेतात. खास ठेवणीतल्या चांदीच्या पेल्यातून फेसाळलेले केशर-वेलचीने सजलेले केशरी दूध दिले जाते. लाह्यांची ओटी भरून पुजेची सांगता होते. या पुजेला कुमारिका उपलब्ध असल्यास कायस्थ गृहिणीची आराधना अगदी पूर्ण होते. काही कुळांमध्ये ‘तिखटय़ा’ सवाष्णींची परंपरा असते. या पुजेला मात्र सामिष नैवेद्य इवल्या वाटीतील ‘तीर्था’ सकट दिला जातो. काही ठिकाणी नवरात्रीत कोलंबीचा नैवेद्य देखील देवीला द्यावा लागतो.
दसऱ्याच्या गोडधोडानंतर दिवाळीचे वेध लागतात आणि कायस्थ स्वयंपाकघरातून कायस्थ मेजवानीचा सरताज, अर्थात ‘खाजाचा कानोला’ दिसू लागतो. पिढय़ानपिढय़ांचे कायस्थ अन्नपूर्णाचे कौशल्य आणि पुण्याई पणाला लागते तेव्हा कुठे कानोला अवतरतो. अन्नात डावे-उजवे करू नये, पण करंजी व कानोला यातील फरक जिभेवरील विरघळणाऱ्या घासालाच कळतो. सुरमट पिठीने घट्ट भरलेला कानोला साजूक तुपात पिसासारखा फुलून कढईतून अलगद बाहेर आला की कायस्थ स्त्री धन्य होते. त्यातही बहुरंगी पट्टय़ांच्या रंगात रंगलेला कानोला करण्याचे कौशल्य निराळेच!
कायस्थ पुरणपोळी हा एक असाच खास पदार्थ. जगात फक्त दोन गोष्टींना तेलाचा अभिषेक केला जातो. पहिला मारुतीराया व दुसरी कायस्थ तेलपोळी. अलगद लाटून तिला लाटण्यावर गुंडाळून तव्यावर सोडली जाते. अगदी समंत्रक नसला तरी नारळाच्या शेंडीने तेलाचा शिडकावा केला जातो. कॅलरी नावाची नावाची ‘तुच्छ’ गोष्ट या वेळी मनात सुद्धा आणू नका.
आतापर्यंत हृदयापासून ते जठरापर्यंत मांसाहारी कायस्थांनी आक्षेपाने भुवई वक्र केली असेलच. असीजीवी व मसीजीवी असलेल्या कायस्थांनी शाकाहाराप्रमाणे मांसाहारालाही तितकेच महत्त्व दिले आहे. गुरुवारी बिरडय़ासाठी तळमळणाऱ्या कायस्थ जीवाला शुक्रवारी मात्र ‘बाजाराचे’ वेध लागतात. आले, लसणाच्या हिरव्या वाटणात घोळवलेली कुरकुरीत ‘तुकडी’, जोडीला लिंबाची फोड, लसणीची खमंग फोडणी दिलेले कालवण व वाफाळलेला भात कुणालाही कृतार्थ करण्यास पुरेसा आहे. हाताला असलेला बाजाराचा वास विरतो न विरतो, तोच रविवारचे वेध लागतात. रविवारी सकाळी कायस्थ श्रींना शोधायचेय? बिनधास्त गावातील मटणाच्या दुकानात किंवा चिकन सेंटरमध्ये जा. तेथे रांगेत हे सापडतीलच. ‘आज काय मिळाले’ याची ‘किती गनिम गारद केले’च्या धर्तीवर चर्चा रंगते. एक वेळ ‘सौ’साठी गजरा नाही आणणार, पण हिरव्या मसाल्याची जुडी न विसरता आणतील. खास प्रसंगी खिम्याचा पॅटीस किंवा खिम्याचा कानवला कोलंबीच्या लोणच्यासह मिळू शकतो. मात्र हा दुर्मिळ योग असतो.
पावसाच्या सरी ताल धरू लागल्या की, कवीचा जीव हिरवाईत गुंततो, तर कायस्थ ‘चिंबोरीच्या’ शोधात निघतो. या अक्कडबाज जिवाला हाडाचा कायस्थ कधीच खेकडा म्हणणार नही. चिंबोऱ्या घरी येणे हा एक सोहळाच असतो. तळल्या मसाल्यात घोळलेली चिंबोरी रसनेची सर्व केंद्रे झणझणवून फक्त कवचापुरती उरते.
अरबांचे घोडे, स्त्रियांचे तोडे तर कायस्थांचे सोडे! आजही कायस्थ मोठय़ा श्रद्धेने मुरुड, अलिबाग येथे उत्तम सोडय़ाच्या शोधात निघतो. आठशे रुपये किलो असा सोनेरी भाव देऊन तो सोडे मिळवतो. न मिळालेले हळहळत राहतात. कायस्थ अन्नपूर्णा कोलंबीच्या या सुक्या अवताराला निरनिराळे रूप देत असते. कधी खिचडी, कधी कालवण तर कधी चक्क उपम्यात व पोह्य़ात सुद्धा! शेवळासारख्या पावसाळी खाजऱ्या भाजीचे देखील कायस्थांना काय कौतुक? त्याची भाजी करतील, कणी करतील, त्यात सोडे घालतील. रसनेला रिझवण्याच्या या खास कायस्थी तऱ्हा!
साकेपी घराघरात घट्ट रुजलेली व जिभेवर निरंतर रुळलेली ही कायस्थ खमंग परंपरा फास्टफूडच्या जमान्यातही अशीच घमघमत राहो!

– साभार लोकसत्ता

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s